कसबा बावडा/प्रतिनिधी :
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची युरोपमधील युरीझोन (EURIZON) फेलोशिप कार्यक्रमासाठी बाह्य तज्ञ समीक्षक म्हणून निवड झाली आहे. युद्धामुळे अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या युक्रेनियन संशोधकांसाठी रिमोट रिसर्च ग्रँट्स प्रदान करण्यावर हा प्रकल्प लक्ष केंद्रित करतो.
या प्रकल्पाद्वारे युक्रेनियन संशोधकांना त्यांचे संशोधन अखंडपणे सुरू ठेवण्यास , संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी खूपच मोलाची मदत होणार आहे. डॉ. सुनिल रायकर हे मटेरियल व मॅनुफॅक्चरिंग मधील प्रकल्पांचे योग्य मूल्यमापन करून युक्रेनियन संशोधकांसाठी रिमोट रिसर्च ग्रँट्स प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील.
डॉ. सुनील जयसिंग रायकर यांच्या निवडीमुळे वैज्ञानिक संशोधनात इंटरनॅशनल कोलॅब्रेशनला चालना मिळणार आहे. जगाच्या विविध भागांतील तज्ञांना एकत्र आणून भौगोलिक अडथळ्यांवर मात करणे आणि ज्ञान आणि कल्पनांची देवाणघेवाण सुलभ करणे हे युरीझोनचे मुख्य उद्दिष्ट आहे. डॉ. सुनिल रायकर यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील व पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, प्राचार्य एस. डी. चेडे यानी अभिनंदन केले आहे.